मुंबई : नास्तिक विचारच माणसाच्या प्रगतीसाठी उपयोगी आहेत. श्रद्धा, अंधश्रद्धा, देव, धर्म शोधत बसण्यापेक्षा माणसाने विज्ञाननिष्ठ व्हावे, बुद्धिनिष्ठ व्हावे असा सूर राज्यभरातून जमलेल्या तरुण नास्तिकांनी ‘वुई द ब्राइट्स’ आयोजित चौथ्या मुक्तचिंतकांच्या मेळाव्यामध्ये काढला. ‘...ब्राइट्स’ या संघटनेने रविवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय मुक्तचिंतकांचा मेळावा आणि नास्तिक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील सांस्कृतिक सभागृहात रंगलेल्या मुक्तचिंतकांच्या मेळाव्यामध्ये राज्यभरातून तीनशेपेक्षा जास्त नास्तिकांनी सहभाग घेतला होता. धर्मनिरपेक्षता या विषयावर चर्चा आणि वादविवाद रंगले. या मेळाव्यादरम्यान शरद बेडेकर यांना ‘चार्वाक पुरस्कार २०१७’ देण्यात आला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात नास्तिक परिषद भरली. या वेळी मुक्तचिंतकांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही देशात भारतीय दंडविधानातील कलमे १५३ अ, २९५ अ आणि २९८ या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या अन्यायकारक तरतुदींचे अस्तित्व नष्ट करून, या कलमांना कायद्यातून रद्द करावे आणि त्या संदर्भात घटनात्मक दुरुस्ती करावी, यासाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संकल्प केला. सरोदे पुढे म्हणाले की, प्रत्येक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम व्यक्त करणे महाराष्ट्रात अनिवार्य झाले आहे. जनतेच्या पैशांवर शिवस्मारक बांधून स्वत:चे मोठेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, हिंमत असेल तर त्यांनी शिवस्मारकासाठी स्वत:कडचेही काही पैसे द्यावेत. इथल्या लोकांना शिवाजी महाराज कळलेच नाहीत. राज्यात महाराजांच्या नावावरून राजकारण केले जात आहे. महाराज जर आज हयात असते, तर त्यांनी या लोकांचा केव्हाच कडेलोट केला असता.धर्मनिरपेक्षतेला संघ परिवार, एमआयएम आणि सांस्कृतिक राष्ट्रवादामुळे धोका निर्माण झाला आहे. मनुस्मृतींबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी धर्मनिरपेक्षतेवर बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)निरुपयोगी कायदे रद्द करापरिषदेत अॅड. असीम सरोदे यांनी ‘धार्मिक भावना : दंडविधानातील कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानामध्ये त्यांनी या कलमांबद्दल माहिती दिली व ते कायदे आत निरुपयोगी असल्याचे नमूद केले. भारतीय राज्यव्यवस्थेवर सडकून टीका करताना ते पुढे म्हणाले की, धार्मिक भावनांच्या आधारावर लोकांमध्ये भांडणे लावणे हे इथल्या राजकारण्यांचे जणू भांडवल आहे.
नास्तिक विचारच माणसाच्या प्रगतीसाठी उपयोगी
By admin | Published: April 10, 2017 6:24 AM