मुंबई: मालाडमध्ये एटीएम मशीनसोबत छेडछाड करणाऱ्याला बँकेच्या सर्व्हीलन्स विभागाने पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सदर भामट्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून ते सध्या त्याच्या पसार साथीदाराच्या शोधात आहे.
तक्रारदार अभिषेककुमार सिंग (२८) हे कोटक महिंद्रा बँकेसाठी सीसीटीव्ही प्रणाली सर्व्हीलन्सचे काम करतात. ज्यात एटीएम मशीन सोबत संशयित बाब आढळल्यास किंवा विशिष्ट अलर्ट प्राप्त होताच सदर सेंटरवर जाऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यानुसार २८ जानेवारी रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास मालाड पश्चिमच्या एमटीएनएल बिल्डिंगजवळ असलेल्या एटीएम सेंटरवर दोन इसम संशयास्पद कृत्य करत असल्याचा अलर्ट सिंग यांना मिळाला. त्यानुसार त्यांनी त्यांचे सहकारी राऊंडर देवीप्रसाद तिवारी यांच्या सोबत मिळून सदर एटीएम गाठले. तेव्हा त्या मशीनच्या शटरला पीव्हीसी पट्टी लावल्याचे उघड झाले. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यावर सिंग आणि तिवारी यांनी आसपासच्या एटीएम सेंटरमध्ये सदर व्यक्तींचा शोध सुरू केला. तेव्हा त्यापैकी प्रदीपकुमार मौर्य (२४) हा त्यांना सापडला. मात्र साथीदार दिपक सरोज हा तिथून पसार झाला. याप्रकरणी त्यांनी पोलीस नियंत्रक कक्षावर फोन केल्यावर मालाड पोलिसांनी मौर्यवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.