एटीएमची कॅश लुटणारी टोळी गजाआड
By Admin | Published: January 1, 2016 02:21 AM2016-01-01T02:21:57+5:302016-01-01T02:21:57+5:30
एचडीएफसी बँकेच्या एटीएमच्या ५१ लाखांच्या लुटीप्रकरणी लुटारू टोळीलाच गजाआड केले आहे. या टोळीने एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेच्या एटीएमची २ कोटी ६४ लाख ४० हजार ९०० ची रोकड
वसई: एचडीएफसी बँकेच्या एटीएमच्या ५१ लाखांच्या लुटीप्रकरणी लुटारू टोळीलाच गजाआड केले आहे. या टोळीने एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेच्या एटीएमची २ कोटी ६४ लाख ४० हजार ९०० ची रोकड लांबवली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ८९ लाख ६९ हजारांची रोकड जप्त केली आहे. या टोळीचा म्होरक्या एचडीएफसी बँकेचा आॅडिटर असून, त्याला आज अटक करण्यात आली.
गेल्या आठवड्यात अॅक्सिस बँकेची ५१ लाख रु.ची कॅश घेऊन सायंटिफिक सिक्युरिटी एजन्सीचा कस्टोडीयन स्वप्नील जोगळे फरार झाला होता. त्याचा तपास करणाऱ्या वालीव पोलिसांनी स्वप्नीलची पत्नी पूर्वा जोगळे आणि भाऊ सागर जोगळे यांना राजापूर येथून अटक करून, त्यांच्याकडून २ लाख ८२ हजार रु. जप्त केले होते, तर दुसऱ्या दिवशी स्वप्नील आणि त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १८ लाख रु. जप्त केले होते. पोलिसांनी जोगळेच्या अटकेनंतर अतिशय गोपनीयता बाळगून सखोल चौकशी केली असता, टोळीच हाती लागली.
एचडीएफसी बँकेचा आॅडिटर ओमप्रकाश गायकवाड हा या टोळीचा म्होरक्या असून, या टोळीत एजन्सीचे कस्टोडियन, काही अधिकारी आणि कर्मचारी सामील असल्याचे तपासात उजेडात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गायक वाडसह स्वप्नील जोगळे, पूर्वा जोगळे, सागर जोगळे, संदीप नाईक, सुशांत आंब्रे, संतोष बने, यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.(प्रतिनिधी)