एटीएमची व्हॅन लुटणाऱ्या आरोपीची आत्महत्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:36 AM2019-01-12T01:36:35+5:302019-01-12T01:38:05+5:30
मंगळवार ८ जानेवारी रोजी नालासोपारा पुर्वेच्या संतोष भुवन मध्ये एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी जाणारी एक व्हॅन लुटण्यात आली होती.
मुंबई - नालासोपारा येथील एटीएम व्हॅन मधील ३८ लाख रूपये लुटणाऱ्या मुख्य आरोपीने शुक्रवारी उत्तरप्रदेशात आत्महत्या केली. पोलीस मागावर असल्याने अटक आणि बदनामीच्या भीतीने त्यने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार आहेत.
मंगळवार ८ जानेवारी रोजी नालासोपारा पुर्वेच्या संतोष भुवन मध्ये एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी जाणारी एक व्हॅन लुटण्यात आली होती. सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून ३८ लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणात सुरेद्र यादव हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. लुटीनंतर आरोपी आपला मुलगा आणि इतर साथीदारांसह उत्तर प्रदेशात फऱार झाला होता. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे चार पथक उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मुगरबादशाहपूर येथे रवाना झाले होते. शुक्रवारी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच यादव याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि अटक झाल्यावर बदनामी होईल या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी असे नालासोपारा येथील पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले. यादव याने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून कुटुंबियांची माफी मागितली आहे.