मुंबई : वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार, पोलीस कुटुंबांनाही तिथेच घरे मिळणार, या वृत्ताने वरळीत सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या १ ऑगस्टच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच, या कार्यक्रमाची पूर्वतयारी पाहण्यासाठी वरळी परिसरात भेट दिली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या पाहणीत लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, गृहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले त्याच्याने मानसिक समाधान मिळाले. हा प्रकल्प नक्की यशस्वी होणार आणि यशस्वी करून दाखवणार, असे मंत्री आव्हाड यांनी यानिमित्ताने बोलताना सांगितले.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम आधी २७ जुलै रोजी होणार होता. मात्र, राज्यात विशेषतः कोकणात आलेल्या पुरामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता, रविवारी १ ऑगस्टला हा सोहळा पार पडणार आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग -परळ व नायगाव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळमजला अधिक तीन मजल्यांची आहे. त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. या चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. तर, येथील झोपडपट्टीधारकांना २६९ चौ. फुटाची सदनिका मिळणार आहे. या योजनेतून १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्याव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकास प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाशांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्प येत्या ७ वर्षांत, तर वरळी येथील प्रकल्प येत्या ८ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मंत्री आव्हाड यांनी दिली.