Join us

मुंबईतील वातावरण ढगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:27 AM

उकाड्यापासून काहीसा दिलासा : मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी अचानक ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मुंबईच्या कमाल तापमानातही काहीशी घट झाल्याने, मुंबईकरांना उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला. दरम्यान, २८ आणि २९ मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.उत्तर कोकण व गोवा येथे कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्याने वातावरण ढगाळ आहे, परंतु विकसित झालेले कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत असून हे फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती अनुभवायला मिळेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट होऊन ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.या ढगाळ वातावरणामुळे बुधवारी मुंबईतील हवेत काहीसा गारवा होता. त्यामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसांत प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २८, २९ मेच्या आसपास मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. या काळात, मुंबई, उपनगरातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, तसेच पश्चिमोत्तर आर्द्र वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून, मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे.कमाल तापमान आणखी खाली येणारहवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील मान्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेमुळे येत्या काही दिवसांत उष्ण तापमानाची स्थिती कमी होण्याची शक्यता असून, सध्या ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते.दरम्यान, किमान तापमानात मात्र किरकोळ बदल अपेक्षित आहेत.

टॅग्स :पाऊसमान्सून 2018