वातावरण अजूनही ‘ताप’दायकच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 06:29 AM2018-11-08T06:29:44+5:302018-11-08T06:29:53+5:30
वातावरणातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी म्हणजेच पुणे, उस्मानाबाद, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची नोंद होत असतानाच मुंबई मात्र कोरडीच आहे.
मुंबई : वातावरणातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी म्हणजेच पुणे, उस्मानाबाद, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची नोंद होत असतानाच मुंबई मात्र कोरडीच आहे. मुंबई शहराचा पारा ३५ अंशावर स्थिर असून, आॅक्टोबर सरला तरी कमाल तापमानात घट झालेली नाही. कमाल तापमानासोबत वाढता उकाडा आणि उन मुंबईकरांचा घाम काढत असून, थंडीनेही अद्याप आगमन केले नसल्याने मुंबईकरांना ‘ताप’ दायक वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुखत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील.
वेंगुर्ला येथे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्ययात आली आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर आदी ठिकाणीही वातातवरण चांगलेच तापले आहे. तर, कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.