मुंबई : वरळी येथील आचार्य अत्रे चौकाजवळील पालिकेच्या बाळकृष्ण रघुनाथ गावडे मंडईच्या पुनर्विकासात मूळ गाळेधारकांवर अन्याय करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे़ याची गंभीर दखल घेऊन पालिका व विकासक यांच्यात झालेल्या या मंडईच्या विकासाच्या कराराची पूर्तता झाली आहे का, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे़बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष अजित भंडारी यांनी नुकतीच या ठिकाणी उभ्या असलेल्या मंडईच्या नवीन इमारतीची पाहणी केली़ यावेळी या मंडईत मासळी विक्री करणाऱ्या महिलांनी दररोज व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी अध्यक्षांकडे मांडल्या़ नवीन मंडईमध्ये पूर्वीच्या तुलनेत कमी जागा आहेत, अद्याप येथे वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आलेली नाही, विद्युत दिवे-पंखे यासारख्या सुविधा नाहीत तसेच सामान ठेवण्याचे कपाट लहान असल्याची तक्रार येथील विक्रेत्यांनी केली़ या पाहणीत मंडईच्या विकासकाने या इमारतीचा पुनर्विकास करताना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नसल्याचे सकृतदर्शनी दिसून आले़ त्यामुळे विक्रेत्यांच्या तक्रारी ऐकून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले़ यात विकासक अथवा संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही भंडारी यांनी येथील विक्रेत्यांना दिली़ भंडारी यांच्याकडे तक्रारी करण्यासाठी विक्रेत्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
अत्रे मंडईच्या पुनर्विकासाची चौकशी
By admin | Published: July 01, 2015 12:52 AM