Join us

सचिन वाझेंविरुद्ध एटीएस लवकरच करणार गुन्हा दाखल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:06 AM

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी संशय; वरिष्ठांच्या संमतीची प्रतीक्षाजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ...

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी संशय; वरिष्ठांच्या संमतीची प्रतीक्षा

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा संबंध असल्याच्या निष्कर्षापर्यंत दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) पोहचले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. वाझे यांच्याकडील तपासाचा अहवाल पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला असून त्यांच्या संमतीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने तीन दिवसांपूर्वी वाझे यांची तब्बल १० तास चौकशी केली. त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी असमाधानकारक दिली. त्यामुळे ते काहीतरी माहिती लपवित असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याच अनुषंगाने १९ मार्चला ठाणे सत्र न्यायालयातील होणाऱ्या त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२५ फेब्रुवारीला पेडर रोडवर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापासून ५०० मीटर अंतरावर २० जिलेटीनच्या कांड्या व धमकीचे पत्र सापडलेल्या महिंद्रा स्काॅर्पिओचे मालक हिरेन यांचा ५ मार्चला रेतीबंदरमधील खाडीत आढळलेला मृतदेह याप्रकरणात वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

* वाझे -हिरेन पूर्वीपासून संपर्कात

व्यापारी मनसुख हिरेन हे पोलिसांचे खबरे म्हणूनही ओळखले जात होते. वाझे यांच्याशी त्यांची खास मैत्री असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांची गाडी वापरणे, तसेच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या विविध आरोपांबाबत वाझे यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे ते कारवाईच्या कचाट्यात सापडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

* ...तर एनआयएकडून कारवाई अटळ

स्काॅर्पिओत जिलेटीन कांड्या सापडल्याच्या कारणावरून राज्य व केंद्र सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. केंद्राने त्याबद्दलचा तपास एनआरएकडे सोपविला आहे. हिरेन यांच्या हत्येबाबत वाझेंविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसने कारवाई न केल्यास एनआयए त्यांच्यावर कारवाई करेल, असे निश्चित मानले जात आहे.

........................