एक अधिकारी मनसुख मृत्यू प्रकरणादरम्यान सीआययु कार्यालयात
मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी
एक अधिकारी मनसुख मृत्यू प्रकरणादरम्यान सीआययु कार्यालयात, दुसरा सीआययु कार्यालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई आणि ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे चौकशी केली. यातील एक अधिकारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या आधी आणि नंतर सचिन वाझे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी मनसुख यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते.
पुढे एटीएसने डायटम चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीत विरोधाभास आढळून आला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा ते जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, अशी माहिती यातून समोर आली. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. त्यानुसार, त्यांचा अभिप्राय येताच पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे, आतापर्यंतच्या तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे दोघांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा यात काही सहभाग आहे का? या दिशेनेही चौकशी करण्यात आली. यापैकी एक अधिकारी ३ ते ५ मार्च दरम्यान गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) असल्याचे समजते. त्याबाबतही यावेळी चौकशी करण्यात आली. याच काळात ४ मार्च रोजी मनसुख कांदिवली कक्षाच्या तावडे नावाच्या व्यक्तिला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. पुढे कांदिवली कक्षात तावडे नावाचा अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकड़ून देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकारी येथे क़ाय करत होता? त्यांचा यात काही सहभाग आहे का? याबाबतही चौकशी करण्यात आली. दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
...................
....