कोठडीतील मृत्यूप्रकरणी एटीएसच्या अधिकाऱ्यांची चौकशी?
By admin | Published: December 31, 2016 03:08 AM2016-12-31T03:08:14+5:302016-12-31T03:08:14+5:30
मालेगावमधील २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रामचंद्रा कलासंग्रा आणि संदीप डांगे यांचा दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीतच मृत्यू झाल्याचा
मुंबई : मालेगावमधील २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रामचंद्रा कलासंग्रा आणि संदीप डांगे यांचा दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीतच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर केला. त्याची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येतील, अशी माहिती शुक्रवारी विशेष न्यायालयाला दिली.
उपरोक्त आरोपांबाबत एनआयएने चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून मेहबूब मुजावर व त्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीएसने दोषारोपपत्रात फरारी म्हणून घोषित केलेले रामचंद्र कालसंग्रा आणि संदीप डांगे हे दोघे वास्तविक फरारी नसून त्यांचा एटीएसच्या ताब्यात असताना २६ डिसेंबर २००८ रोजी मृत्यू झाला. यासंदर्भात सोलापूर सत्र न्यायालयात अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या दाव्यामुळे एटीएसच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एनआयएन योग्य ती पावले उचलेल, अशी माहिती एनआयएचे वकील अविनाश रसाळ यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाला दिली. कलासंग्रा आणि डांगे हे दोघेही मालेगाव आणि मध्य प्रदेशातील बॉम्बस्फोटाप्रकरणी फरारी आरोपी आहेत. एवढी वर्षे त्यांच्या ठावठिकाणाबाबत तपास करण्यात आला की नाही?, याची माहिती घेतली जाईल. आधी मुजावर यांची चौकशी करण्यात येईल. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळले तरच एटीएसच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकारी, दोन निवृत्त पोलीस महासंचालक आणि सध्या सेवेत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांनी या दोघांची हत्या लपवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यासाठी तयार नसल्याने मला खोट्या गुन्ह्यात अडकवून निलंबित केले, असेही मुजावर यांनी सांगितले.
एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, सुधाकर पांड्येनंतर या बॉम्बस्फोटाची जबाबदारी रामचंद्र कलासंग्रावर होती. त्यानेच प्रज्ञा सिंहच्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवले. ही मोटारसायकल मशीदीजवळ ठेवताना डांगेही त्याच्याबरोबर होता. २९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावच्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू तर १०१ लोक जखमी झाली. हा बॉम्बस्फोट हिंदू संघटनांनी केल्याचे एनआयच्या तपासातून सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी)