एटीएस घेणार सचिन वाझेचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:06 AM2021-03-24T04:06:27+5:302021-03-24T04:06:27+5:30
मनसुख हिरेन हत्या प्रकरण; आरोपींनी सीसीटीव्हीही केले नष्ट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ...
मनसुख हिरेन हत्या प्रकरण; आरोपींनी सीसीटीव्हीही केले नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेचा ताबा एटीएस लवकरच घेणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेल्या वाझेची २५ तारखेला कोठडी संपत असल्याने त्याचा ताबा मिळावा यासाठी एटीएसने एनआयए कोर्टात मागणी केली आहे. ठाणे दंडाधिकाऱ्यांकडून त्याचे ट्रान्सफर वाॅरंटही घेतले आहे. वाझेच्या ताब्यानंतर हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओप्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. मनसुख यांच्या हत्या प्रकरणात वाझे आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांनी कार्यालय, परिसर तसेच अनेक मार्गांवरील सीसीटीव्ही फूटेज नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. वाझेच्या चौकशीतून यामागील हेतू स्पष्ट होईल, असे सिंह यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. वाझेच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचे महत्त्वाचे पुरावेही एटीएसच्या हाती लागले आहेत.
...............................