ड्रग्ज तस्करांच्या मुख्य सूत्रधाराचा शाेध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यात सापडलेल्या चरस विक्रेत्यांच्या मुख्य सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) हिमाचल प्रदेशात रवाना झाले आहे. कुलू मनाली येथून चरस व कोकेन मुंबई, गोवा, तसेच अन्यत्र मोठ्या प्रमाणात पाठविले जात असल्याचे तपासातून समोर आल्याने तेथे पथक पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे लोहमार्ग पोलिसांनी २० डिसेंबरला ललितकुमार दयानंद शर्मा (५०) व कोलसिंग रूपसिंग (४३, दोघे रा. भुन्तर, कुलू, हिमाचल) यांना अटक केली. त्यांच्याकडे ३४.४ किलो चरस सापडले हाेते. दोघे टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायाच्या माध्यमातून ही तस्करी करीत असल्याची बाब पुढे आली. त्यांचे रॅकेट मुंबई, गोवा व देशातील अन्य प्रमुख शहरात अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याने, या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करण्यात आला.
कुलू येथून तस्करी होत असून, त्या ठिकाणी कोकेनची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याचा छडा लावण्यासाठी उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक शनिवारी तेथे रवाना झाले. स्थनिक पोलिसांच्या सहकार्याने या टोळीतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.
............................