जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे : एकीकडे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) विशेष पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी रविवारी मुंब्रा रेतीबंदर भागास भेट देऊन मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याच्या ठिकाणाची पाहणी केली. या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यासाठी संपूर्ण घटनाक्रमाची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एटीएसचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने या प्रकरणाची रविवारी चौकशी सुरू केली. त्यावेळी मनसुख यांची पत्नी विमला यांच्यासह कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केल्यानंतर मोठा मुलगा मित याने मुंबईच्या एटीएस कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीपाशी स्फोटके ठेवण्याकरिता मनसुख यांच्या मोटारकारचा वापर करण्यात आला होता. याही प्रकरणाचा तपास एटीएसकडूनच सुरू आहे.
दुसरीकडे हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी घटनाक्रम तपासताना ते ४ मार्च रोजी रात्री ८ वाजून २८ मिनिटांनी घराबाहेर पडल्यापासून ते घोडबंदर रोड येथे गेल्यापर्यंत, तसेच टॉवर लोकेशन वसईत मिळाल्यापर्यंत ते नेमके कोणाच्या संपर्कात होते? दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीमध्ये मिळेपर्यंत नेमके काय घडले असावे? या सर्व बाबींची या पथकांकडून पडताळणी केली जात आहे. कळवा ब्रिजवरून खाली पडल्यानंतर पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे? ते कुठपर्यंत वाहत येऊ शकतात? अशा प्रकारे संपूर्ण सीन पुन्हा उभारून (रिक्रीएट) या घटनेचा बारकाईने तपास केला जात आहे. शिवाय, रात्री त्यांना फोन आल्यानंतर आणि त्याआधीही ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, हे तपासून यातील सर्व संशयितांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...तर न्याय मिळेलबिहार केडरचे आयपीएस शिवदीप लांडे हे सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुंबईत आल्यानंतर नार्कोटिक्स ब्यूरोमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अशा धाडसी अधिकाऱ्याकडे हा तपास आल्यामुळे या प्रकरणाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.