मुंबई : वेळ दुपारी साडेबाराची. नेहमीप्रमाणे न्यायालय सुरू होते. एका प्रकरणात गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर दुसºया गुन्ह्याचा खटला सुरू होता. सर्वांचेच लक्ष न्यायाधीशांकडे होते. याच शांततेत ‘वाचवा वाचवा...’चा आवाज होत, रक्तबंबाळ अवस्थेत निर्दोष मुक्तता झालेले आरोपी न्यायाधीशांच्या दिशेने धावले. पुढे आरोपी आणि मागे हातात चाकू घेऊन लागलेला तक्रारदार असे काहीसे थरारक चित्र बुधवारी मुंबईतील भोईवाडा कोर्टात घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कसेबसे हल्लेखोराच्या तावडीतून आरोपींची सुटका केली आणि त्याला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केली.हरिश्चंद्र मुक्तिराम शिरकर (६७) असे हल्लेखोराचे नाव आहे. खार परिसरात राहणाºया शिरकरचा कपड्याचा व्यवसाय आहे. घराच्या मालकी हक्कावरून भाऊ देवटकरसोबत त्याचा वाद सुरू होता. हा वाद सुरू असताना २००९ मध्ये भावासह त्याचे दोन मित्र महेश वासुदेव म्हाप्रोळकर (४१), नंदेश भिकुराम कादवडकर (४७) यांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईवाडा येथील ५ क्रमांकाच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला.या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तिन्ही आरोपी ‘आम्ही सुटणार आहोत, तू आमचे काहीही करू शकत नाहीस,’ असे म्हणत त्याला हिणवत होते. त्यामुळे हरिश्चंद्र रागावला. बुधवारी अंतिम निकालादरम्यान आरोपींची निर्दोष मुक्तता होणार याची भीती त्याला होती. त्यामुळे घरातून निघताना तिघांना संपविण्याच्या उद्देशाने तो सोबत चाकू घेऊन निघाला.भोईवाडाच्या ५ क्रमांकाच्या न्यायालयात न्यायाधीश एस. जे. सयानी यांच्या खंडपीठाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे तिघांनीही सुटकेचा निश्वास सोडला आणि ते हरिश्चंद्रकडे पाहून त्याला चिडवू लागले. आरोपींचे वकील आर. शिरकर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत होते. त्यामुळे तिन्ही आरोपी न्यायालयाच्या मागच्या बाकड्यांवर बसले होते. दुसºया प्रकरणातील गुन्ह्याचा खटला सुरू होता. सर्वांचे लक्ष खटल्याकडे होते. हीच संधी साधून संतापलेल्या हरिश्चंद्रने प्लॅस्टिकच्या पिशवीतील चाकू काढून महेश, नंदेशवर पाठीमागून वार केले. वार होताच दोघे जोरात ओरडत घाबरून न्यायाधीशांच्या दिशेने धावत गेले.शिवीगाळ करत हरिश्चंद्र त्यांच्या मागे धावला. अखेर पोलिसांनी हरिश्चंद्रला कसेबसे ताब्यात घेतले. दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी हरिश्चंद्रला जबर मारहाण केल्याप्रकरणी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.>गेल्या वर्षीच घराचा वाटा...एल्फिस्टन परिसरात शिरकर कुटुंबीयांचे घर होते. चार बहिणी आणि चार भाऊ असे त्यांचे कुटुंब. आईवडिलांच्या निधनानंतर मोठ्या बहिणीने या घरासाठी न्यायालयात धाव घेतली. २००४ मध्ये बहिणीचे निधन झाले.घराच्या वादातून हरिश्चंद्र मुक्तिराम शिरकर (६७) आणि भाऊ देवटकरमध्ये वाद सुरू झाला. याच वादातून ८ जून २००९ मध्ये भावासह त्याच्या दोन मित्रांनी त्याला मारहाण केली.या प्रकरणी हरिश्चंदने दादर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा खटला सुरू असतानाच, २०१६ मध्ये शिरकर भावंडांनी ते घर ७० लाखांत विकले आणि आलेली रक्कम सर्वांनी वाटून घेतली होती.
मुंबई : भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकूहल्ला, परिसरात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 2:37 PM