Join us

भाजपा नेते राजन तेली यांच्या मुलावर हल्ला

By admin | Published: January 19, 2017 6:08 AM

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर स्थानकात मंगळवारी रात्री हल्ला झाला.

मुंबई : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर स्थानकात मंगळवारी रात्री हल्ला झाला. प्रथमेशने केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेस आमदार तथा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी एका आरोपीला अटक करण्यात आली असून रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए-१ बोगीत प्रवेश केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर काही सामान तर राहिले नाहीना हे पाहण्यासाठी प्रथमेश पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. तेव्हा समोरच उभ्या असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीने प्रथमेशशी हात मिळवला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्यानेही मारहाण केली. त्यातील एकाने ‘गाडीखाली ढकलून दे’, अशी धमकीही दिली. प्रथमेशने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्याचे दोन भाऊ मदतीला आले. त्यानंतर दोघे पळू लागले. त्यातील एकाला आरपीएफच्या जवानाने पकडले. घटनेनंतर प्रथमेशने दादर लोहमार्ग पोलिसांत नितेश राणे यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणीत खरात याला अटक करण्यात आली असून त्याचे तीन साथीदार आकाश साळवी, विनीत गायकवाड, मोहित गरुड यांचा शोध घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)>प्रथमेश तेली यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. तर अन्य तीन जणांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. - निकेत कौशिक, लोहमार्ग-पोलीस आयुक्तसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राजन तेली आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांवर काही प्रतिक्रिया न देणे, हेच बरे आहे. - नीतेश राणे, आमदार