डहाणूच्या कोळंबी प्रकल्पावर हल्लाबोल
By admin | Published: June 27, 2015 11:45 PM2015-06-27T23:45:52+5:302015-06-27T23:45:52+5:30
डहाणूच्या सरावली (तलावपाडा) येथील वादग्रस्त कोळंबी प्रकल्पावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थांनी हल्लाबोल करून त्याचे मोठे नुकसान केले.
डहाणू : डहाणूच्या सरावली (तलावपाडा) येथील वादग्रस्त कोळंबी प्रकल्पावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थांनी हल्लाबोल करून त्याचे मोठे नुकसान केले. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात दंगल करणे, नुकसान करणे, जाळपोळ करणे, या आरोपाखाली पंचवीस मुख्य व इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश आलेले नाही. (वार्ताहर)
सरावली तलावपाडा हद्दीत डहाणूचे नरेश पटेल तसेच दिवंगत आ. कृष्णा घोडा यांचे सुपूत्र राजेश घोडा व अन्य काही लोकांना शासनाने तीस वर्षाच्या कराराने कोळंबी संवर्धनासाठी या जमिनी भाडेतत्वावर दिल्या होत्या. परंतु नियोजित कोळंबी प्रकल्पामुळे परिसरातील मितना समाज या खाजण जमीनीवर पारंपारीक पद्धतीने निवटी जातीचे मासे पकडण्याचा व्यवसाय करीत असल्याने व त्यांच्या व्यवसायाला बाधा येणार असल्याने ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे २४ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी सरावली जकात नाक्यावर रास्ता रोको केला होता. हा कोळंबी प्रकल्प होऊ नये म्हणून स्थानिकांनी तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली होती.
जमाव आक्रमक; पोलिसांचा फियास्को
१शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास येथील सुमारे तीनशे-चारशेच्या जमावाने थेट या प्रकल्पावर जोरदार हल्ला केला. यावेळी कोळंबी प्रकल्पाचे बांध फोडून तयार झालेली लाखोची कोळंबी समुद्रात सोडून देण्यात आली. शिवाय काहीजण कोळंबी भरून निघून गेले. या वेळी आंदोलकांनी कोळंबी प्रकल्पातील सामानाची नासधूस केली. या जमावामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले.
२परंतु जमाव अधिक आक्रमक झाल्याने पोलीसांचे काहीच चालले नाही. त्यामुळे कासा, घोलवड, वानगांव, भागातील पोलीसांना बोलविण्यात आले तर बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड, पो. निरिक्षक के. हेगाजे, पो. निरिक्षक शेलार घटनास्थळी पोचले मात्र तो पर्यंत आंदोलक धिंगाणा घालून निघून गेले होते. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसले तरी कोळंबी प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचे नरेश पटेल म्हणाले.