मुंबई : जेवणाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना चेंबूरमध्ये मंगळवारी रात्री घडली. यामध्ये नितेश गुप्ता (१९) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी ग्राहकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.गुप्ता यांचे चेंबूर कॅम्प परिसरात चायनीज पदार्थाचे दुकान आहे. रात्री साडे आठच्या सुमारास आरोपीने त्यांच्याकडे जेवण केले. जेवण झाल्यानंतर गुप्ता यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र आरोपीने देण्यास नकार दिला. याच रागात दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याचेच रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने जवळील कोयत्याने गुप्तावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.स्थानिक जमताहेत हे लक्षात येताच त्याने पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने गुप्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जेवणाचे पैसे मागितले म्हणून चालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:36 IST