Join us

कलिना येथे पत्रकारावर हल्ला

By admin | Published: March 29, 2016 2:11 AM

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पत्रकारावर सहा जणांनी घरात घुसून हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चार जणांना अटक केली. मात्र त्यांना कोर्टात

मुंबई : एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पत्रकारावर सहा जणांनी घरात घुसून हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चार जणांना अटक केली. मात्र त्यांना कोर्टात हजर न करता रातोरात त्यांची सुटका करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.झुबेर अन्सारी असे या पत्रकाराचे नाव असून ते एका इंग्रजी दैनिकात गुन्हेक्षेत्राचे वार्तांकन करतात. ते कलिना येथील योगीराज आश्रम येथे कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चार जण त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी अन्सारी यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काश्मिरा सिंग (३०), मिठ्ठी सिंग (३०), बंटी सिंग (२६), दत्ता सिंग (२३) आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांविरोधात अन्सारी यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या चौघांवर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. मात्र त्यांना न्यायालयासमोर हजर न करता त्याच रात्री त्यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे सोमवारी याप्रकरणी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांना जाऊन भेटले आणि अन्सारी यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी व्हावळे यांना केली.अन्सारी यांच्यावर हल्ला करणारे चौघे हे अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. ‘अन्सारी हे आमच्या गाडीच्या दिशेने थुंकल्यामुळे वाद झाला’ असे या चौघांनी जबाबात म्हटल्याचे व्हावळे यांनी सांगितले. तर जुन्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे अन्सारी यांचे म्हणणे आहे. आम्ही याप्रकरणी चौकशी करत असून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन वाकोला पोलिसांकडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)