Join us

वकिलावर हल्ला; भररस्त्यात रंगला थरार, माटुंग्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:47 AM

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ४८ वर्षीय वकिलावर लुटीच्या उद्देशाने हल्ला चढविल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा येथे शुक्रवारी घडला. त्यांनी बचावासाठी पळ काढला. दोघेही तरुण त्यांच्या मागे धावत होते.

मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ४८ वर्षीय वकिलावर लुटीच्या उद्देशाने हल्ला चढविल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा येथे शुक्रवारी घडला. त्यांनी बचावासाठी पळ काढला. दोघेही तरुण त्यांच्या मागे धावत होते. मदतीसाठी वकिलाने जवळील बीट चौकी गाठली. मात्र ती बंद असल्याने ते रस्त्यावरून मदतीसाठी धावत होते. त्याच दरम्यान दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने वकिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.माटुंगा परिसरात हरिओम बाबुलाल मानव (४८) हे कुटुंबासह राहतात. ते सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात. शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आले. येथीलच पाच उद्यानाजवळील माटुंगा पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक ३ जवळ ते योगा करत होते. त्याचवेळी दोन तरुण त्यांच्याजवळ आले, मला ओळखलेत का? असे म्हणत धक्काबुक्की सुरू केली. त्यांना काही समजण्याच्या आतच लुटारूंनी त्यांना मारहाण सुरू केली. त्या वेळी त्यांनी बीट चौकीकडे धाव घेतली. मात्र बीट चौकी बंद होती. तेथून ते बसथांब्याच्या दिशेने निघाले. तेव्हा दोघेही त्यांच्यापाठीमागून धावत होते. अखेर वाटेत त्यांना अडवून मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. तेथून त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.- लुटीच्या उद्देशानेच हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मानव यांनी केलेले आरोपींचे वर्णन तसेच परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबई