Join us

काँग्रेसवर हल्लाबोल, शिंदे-फडणवीस-पवारांचं कौतुक; मोदींनी सांगितला १० वर्षांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 7:07 PM

मुंबईतील अटल सेतू हा १६.८ किमीचा सागरी मार्ग असून हे अंतर केवळ २० मिनिटांत कापता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमुंबईतील आणि देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे २०१६ साली मोदींनीच या पुलाच्या भूमिपूजनाचे काम केले होते. त्यानंतर, आता देशातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या या पुलाचे लोकार्पणही मोदींच्याच हस्ते करण्यात आले. त्यामुळे, आजपासून हा सागरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुंबई ते नवी मुंबई, रायगडला जोडणारा हा मार्ग आगामी काळात दळणवळण यंत्रणा सक्षम करणारा ठरेल. दरम्यान, या पुलाच्या लोकार्पणानंतर बोलताना नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

मुंबईतील अटल सेतू हा १६.८ किमीचा सागरी मार्ग असून हे अंतर केवळ २० मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे, गतीमान व सुकर प्रवास शक्य होणार आहे. मोदींनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या १० वर्षात झालेल्या गतीमान, वेगवान कामाचा आढावा सांगताना भारत बदलत असल्याचे म्हटले. १० वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत हे चित्र बदलेलं असल्याचंही मोदींनी म्हटलं. अटल सेतू हे विकसित भारताचं प्रतिक आहे. विकसित भारत कसा असणार आहे, याची झलक म्हणजे मुंबईतील अटल सेतू होय. विकसित भारतात सर्वांची समृद्धी होणार आहे, गती असणार आहे, प्रगती असणार आहे, दूरचं अंतर मिटरणार असून देशातील कानाकोपरा एकमेकांशी जोडला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. 

गेल्या १० वर्षात भारत बदलला आहे, बदललेल्या भारताची प्रतिमा तेव्हा स्पष्ट दिसते, जेव्हा आपण गेल्या १० वर्षांपूर्वीचा भारत पाहतो. १० वर्षांपूर्वी हजारो, लाखो, करोडोंच्या मेगा स्कॅमची चर्चा होती होती. आज मेगा प्रोजेक्टच्या पूर्ण होण्याची चर्चा होते. सुशासनाचा संकल्प देशभरात पाहायला मिळतो आहे. आज एकानंतर एक बनणाऱ्या एक्सप्रेस वेची चर्चा होत आहे. आज भारतात आधुनिक रेल्वे स्टेशन बनताना पाहात आहोत. ईस्टर्न-वेस्टर्न कोरिडोअर रेल्वेची प्रतिमा बदलणार आहेत. वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेन सर्वसामान्यांचा प्रवास आरामदायी व जलद झाला आहे. 

मुंबई-वांद्रे सी लिंक प्रकल्प हा अटल सेतूपेक्षाही ५ पटीने लहान आहे. पण, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी यापूर्वीच्या सरकारच्या काळात १० वर्षे लागली. तर, या ब्रिजचे बजेटही ४ ते ५ पट अधिकपटीने वाढले होते, असे म्हणत मोदींनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मेगा प्रकल्पांचे लोकार्पण झाले, काही प्रकल्पांचे लोकार्पण मार्गावर आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई व कोस्टल रोड प्रोजेक्टवरही वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे, मुंबईचा कायापालट होणार आहे. येणाऱ्या काळात मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळणार आहे. दिल्ली-मुंबई कोरिडोअर महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडत आहे.  

आम्ही एकीकडे अटल सेतू बनवत बनवत आहोत, तर दुसरीकडे अटक पेन्शन योजनाही सुरू केली आहे. एकीकडे वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे, दुसरीकडे आयुष्यमान भारत योजनाही सुरू केली आहे. आम्ही शेतकरी सन्मान निधीही देत आहोत, तर किसान शक्ती प्रकल्पही सुरू करत आहोत. कारण, आमची नियत व निती साफ आहे. सरकारची निष्ठा ही केवळ देश आणि देशवासीयांप्रती आहे, असे म्हणत मोदींनी मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विकास केल्याचं म्हटलं. यावेळी, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.  ज्यांनी देशावर गेली अनेक वर्षे राज्य केलं, त्यांच्या नियत आणि निष्ठेवर नेहमीच प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची नियत केवळ सत्ता मिळवण्याची राहिली, मतांचा गठ्ठा निर्माण करण्याची, स्वत:ची तिजोरी भरण्याची राहिली. त्यांची निष्ठा देशवासीयांप्रती नव्हती, केवळ आपल्या कुटुंबास पुढे नेण्याची होती, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. देशात २०१४ पूर्वी पायाभूत सुविधांसाठी केवळ १२ लाख कोटी रुपयांचं बजेट दिलं जात होतं. मात्र, गेल्या १० वर्षात आमच्या सरकारने ४४ लाख कोटी रुपयांचं बजेट पायाभूत सुविधांसाठी दिलंय, असे मोदींनी सांगितले. म्हणूनच, आज देशात मोठ-मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईकाँग्रेसएकनाथ शिंदेभाजपा