Nilesh Rane: आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला, निलेश राणे ठाकरेंवरच संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:51 AM2022-09-27T07:51:22+5:302022-09-27T08:05:16+5:30
आमदार संतोष बांगर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेनेही खुले आव्हान दिले आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर होते
मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असून, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरुन, आता शिदें गट विरुद्ध शिवसेना असा वाद टोकाला गेला आहे. त्यातच, माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरेंवर बोचरी टिका केली.
आमदार संतोष बांगर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेनेही खुले आव्हान दिले आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांनी बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आतापर्यंत ११ शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी जशास तसे उत्तर देण्याचा धमकीवजा इशारा शिवसैनिकांना दिला होता. त्याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर देताना खुले आव्हान दिले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी संतोष बांगर यांच्यावर पलटवार केला. मात्र, या वादावर आता निलेश राणे यांनी भाष्य करताना ठाकरेंना चांगली भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, असे म्हणत टिका केली.
ठाकरेंची स्थिती पिसाळलेल्या कुत्र्यागत झाली असून पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं हे मला वेगळं सांगायची गरज नाही. संतोष बांगर यांच्या गाडीवर काल हल्ला झाला. त्यामुळे हे आता चांगल्या भाषेतून ऐकणार नाहीत, यांना फटकेच घातले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या भाषणापासून सांगतायेत आमचा संयम तोडू नका. पण, जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेना आणि ठाकरेंवर निशाणा साधला.
बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा
हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा. माझे त्यांना आव्हान आहे. तुम्ही कधी, किती लोकं घेऊन येता आम्हाला सांगा. वेळ, ठिकाण आणि तारीख त्यांनी सांगावी. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कोण तेव्हा तुम्हाला दाखवू. तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो. दुसऱ्या दिवशी खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये, असे सांगत सुर्यवंशी यांनी संतोष बांगरांना चांगलेच डिवचले आहे.