मुंबई : एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी शुक्रवारी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद शनिवारी राज्यभरात उमटले. भाजपसह सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. हल्ला होईल, मोर्चा निघेल याची पोलिसांनी कल्पना होती, असेही तपासातून पुढे आल्याने पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे दिसत आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या घरावर हल्ला होणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, १०९ कर्मचारी न्यायालयीन कोठडीत मुंबई : सत्र न्यायालयात झालेल्या तीन तासांच्या युक्तिवादानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे सांगत ही कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्ते यांचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळला असून, त्यांना वरच्या कोर्टात जामीन अर्ज करण्याकरिता मुभा दिली आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या १०९ आंदोलकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामध्ये, सदावर्तेंसह ११० जणांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. यावेळी सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर सदावर्ते यांच्या बाजूने तब्बल ७ वकिलांची फौज उभी होती. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना गुन्ह्यातील कलमे वाचून दाखवत ही कलमे गंभीर असल्याचे न्यायालयाला सांगितले. सदावर्तें यांनीच कामगारांना शरद पवार यांच्या घरावर आंदोलनासाठी जायला प्रोत्साहित केले. तसेच हे मोठे षङ्यंत्र असून याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांच्यासह अन्य आरोपींकडे चौकशी करण्यासाठी त्यांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.‘इतक्या लोकांचा तपास १४ दिवसांत शक्य आहे का?’ अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. ‘हायकोर्टाच्या आदेशाने २२ एप्रिलला सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हायचे होते, पण तसे करण्याआधीच हा प्रकार घडला. सदावर्ते यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. गरीब एस.टी. कर्मचाऱ्यांना भडकावले गेले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, असे घरत यांनी सांगितले.
न्यायाधीशांनीच केली सदावर्ते यांची तपासणीपोलीस कोठडी सुनावल्यानंतर, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सहायक आयुक्त पांडुरंग शिंदे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेताना आपल्यासोबत गैरवर्तन आणि बळाचा वापर केल्याचा आरोप न्यायालयात केला. तसेच त्यांनी आपल्या हाताला दुखापत झाली आणि चष्मा फुटल्याचेही न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायाधीश कैलास सावंत यांनी स्वतः ॲड. सदावर्ते यांची तपासणी केली. तसेच वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असे सांगितले. मात्र, कायद्यानुसार त्यांना आवश्यक औषधे देण्याचे आदेश दिले आहेत.
पे स्लीपमुळे मृत एसटी कर्मचाऱ्याची ओळख पटलीमुंबई : सिल्व्हर ओक येथील आंदोलनानंतर, एल्फिन्स्टन परिसरात सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्युदेहामुळे तणावात भर पडली आहे. महेश लोले (४२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्याकडे मिळालेल्या पे स्लीपमुळे तो एसटी कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी रात्री ७ वाजता परळ आगारापासून १०० मीटर अंतरावर असणाऱ्या सारथी बिअर बारजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यांच्या खिशात आधार, पॅनकार्ड आणि पगाराची स्लीप मिळाली. त्यामुळे ते एसटी कर्मचारी असल्याचे समजताच पोलिसांनी आधार कार्डवरून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. ते मूळचे इचलकरंजी येथील रहिवासी असून, कोल्हापूरच्या कागल आगाराचे वाहक असल्याचे समजले. भावाकडून मिळालेल्या माहितीतून, त्यांच्या पत्नीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. ते १३ वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांना दारूचेे व्यसन लागले. एसटीच्या आंदोलनात तेही सप्टेंबरपासून सहभागी झाले होते. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्याच्या दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुकुटराव यांनी दुजोरा दिला आहे.कर्मचारी बेपत्ता?यातच काही जणांनी काही कर्मचारी बेपत्ता असल्याचेही सांगितले. मात्र हे कर्मचारी बेपत्ता नसून शुक्रवारी रात्री त्यांनी रेकी केल्यामुळे अटक केल्याचीही माहिती नंतर समोर आली. याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.