Join us

Attack on Sharad Pawar House: शरद पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय; या कृत्यामागे कोण शोधून काढा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 8:46 PM

अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुंबई - राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून  यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) म्हणाले की, नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन  करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत  एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत. या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

नेमकं काय घडलं?

अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेएसटी संप