Join us  

वृद्धेला गंडा घालणारे अटकेत

By admin | Published: June 23, 2014 2:03 AM

एका बड्या विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत वृद्ध महिलेला दीड लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली

मुंबई : एका बड्या विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत वृद्ध महिलेला दीड लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली. यात एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.भायखळा येथील क्रॉस रोड येथे राहणाऱ्या पिंगळा केळूसकर (६०) सहा महिन्यांपूर्वीच जे. जे. रुग्णालयातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली काही रक्कम त्यांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीत गुंतवली होती. मात्र त्या काही हफ्त्यांची रक्कम त्या भरू शकल्या नव्हत्या. नोव्हेंबर २०१३ मध्ये एका इसमाने फोन करून आपण एचडीएफसीमधून बोलत असल्याचे सांगितले. विम्याची रक्कम भरली नसल्याने तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते. त्यामुळे लवकरच पैसे भरा, असे त्याने केळूसकर यांना सांगितले. त्यानंतर त्या इसमाने वारंवार फोन करून पैसे भरण्यासाठी तगादा लावला. शिवाय पैसे घेण्यासाठी घरी येणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे पैसे द्या, असेही त्याने बजावले. ठरल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात केळूसकर यांनी घरी आलेल्या प्रतिनिधीकडे काही रक्कम दिली. त्याने केळूसकर यांना एक नवीन पॉलिसी काढण्यास सांगून त्यांच्याकडून १ लाख ५६ हजार रुपये इतकी रक्कम घेतली. पैसे भरल्यानंतर दोन महिने उलटूनही कंपनीकडून विम्याच्या पावत्या न आल्याने केळूसकर यांना संशय आला. त्यांनी महालक्ष्मी येथील कंपनीचे कार्यालय गाठून चौकशी केली असता हफ्त्याची कुठल्याही प्रकारची थकबाकी कंपनीत जमा झालेली नसून नवीन पॉलिसीही काढण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केळूसकर यांनी त्याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आरोपीकडून पुन्हा एकदा केळूसकर यांना विम्याची थकबाकी घेण्यासाठी फोन आला. ही बाब त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांनी या आरोपीला पैसे घेण्यासाठी हरे राम हरे कृष्णा मंदिराजवळ बोलावले. या ठिकाणी आधीच पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. ठरल्याप्रमाणे दोन आरोपी या ठिकाणी आले. दोघेही केळूसकर यांच्यासोबत बोलत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आकाश पाटील (२७) आणि रिंकी शांताकुमार (२४) अशी या आरोपींची नावे असून, दोघेही ठाण्याचे राहणारे आहेत. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अशाप्रकारे या आरोपींनी आणखी अनेकांना गंडा घातला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. (प्रतिनिधी)