Join us

विदेशी चलनाच्या आमिषाने फसवणारी टोळी अटकेत

By admin | Published: January 12, 2015 2:02 AM

विदेशी चलन देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घणसोली गाव येथे भाडोत्री घरामध्ये ते राहत होते

नवी मुंबई : विदेशी चलन देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घणसोली गाव येथे भाडोत्री घरामध्ये ते राहत होते. त्यांच्याकडून अमेरिका व सौदी अरब देशाचे सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे चलन जप्त करण्यात आले आहे.स्वस्त किमतीमध्ये विदेशी चलन देतो सांगून फसवणुकीच्या घटना शहरात घडत आहेत. ७ जानेवारी रोजी बन्सीलाल डंक (६१) यांचीही अशाच प्रकारे तीन लाख रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता खंडणी विरोधी पथकाने कारवाई करुन पाच जणांना अटक केली आहे. घणसोली गाव येथील चिंचआळीमधील सोनी अपार्टमेंटमध्ये ते भाड्याने राहत होते. मोहम्मद टिकू खान (३२), मोना शेख (२२), मोहम्मद अली खान (२२), सयदुल नागोत्री (२१) आणि इरफान शेख (२२) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी डंक यांना सौदी अरब देशाचे चलन देतो सांगून फसवणूक केली. डंक यांच्याकडून तीन लाख रुपये रोख घेऊन त्याबदल्यात रुमालात गुंडाळलेले कागदाचे बंडल दिले. कागदाच्या बंडलवर पहिल्या एक ते दोन खऱ्या नोटा लावून हे बंडल ग्राहकाकडे दिले जाते. त्यानंतर ग्राहकाकडून पैसे मिळताच ते पळ काढतात. स्रियांच्या मदतीने नागरिकांना फसवण्याचे काम ही टोळी करत होती. अशा प्रकारे त्यांनी नवी मुंबईसह, ठाणे व मुंबई येथील नागरिकांना फसवले असल्याचे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सांगितले. त्यांच्याकडून अमेरिका व सौदी अरब देशाचे तसे भारतीय नोटा असा सुमारे ६५ हजार रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे व सहाय्यक आयुक्त रणजित धुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. विदेशी चलन देण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या शहरात कार्यरत आहेत. फसवणूक करुन मिळवलेल्या रकमेची ठराविक टक्केवारी हा टोळी प्रमुख त्यांना देतो. त्यानुसार टोळी प्रमुखाचाही शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले. तर यात रॅकेट असण्याची शक्यातही व्यक्त केली. (प्रतिनिधी)