Join us

"लोकप्रतिनीधींवर हल्ले, त्यांची घरे जाळली जात आहेत; गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:00 PM

खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. माजलगावातील राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. नंतर घराजवळील त्यांच्या गाडीसह इतर वाहने पेटविले. याच ठिकाणी काही आंदोलकांनी घरातील साहित्यालाही आग लावली. राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यावरुन, खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्था, सहकारी संस्थांच्या इमारतीवरही दगडफेक केली. तसेच संस्थासंमोर टायर जाळण्यात आले. तेथून हे आंदोलक नगर पालिकेत गेले. तेथेही जाळपोळ करून दगडफेक केली. सध्या तरी शहरात तणावाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. आंदोलकांकडून आ.सोळंके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावरुन, खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच, त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली. 

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌ याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापूर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

आमदाराने दिला राजीनामा

मराठा आरक्षणासाठी आमदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी सातत्याने आंदोलकांकडून होत होती. त्यात बीडच्या गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची धग आता राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली.  

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसभाजपा