Join us  

हिरे व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Published: March 23, 2016 2:58 AM

पाच कोटींच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात बोरीवली परिसरात घडला होता.

मुंबई : पाच कोटींच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात बोरीवली परिसरात घडला होता. मात्र व्यापाऱ्याने प्रसंगावधान राखून आपली सुटका करण्यात यश मिळविले होते. त्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली असून अद्याप दोन साथीदार फरारी आहेत.महेश परमार (वय ४०), रमेश पार्ते (३८), केजुल मोर्बिया (२४) आणि बोस नारायण भुवनेश्वर पांडे उर्फ रोमी उर्फ राम नारायण पंचम पांडे (३१) अशी त्यांची नावे आहेत. बोरीवली पश्चिमच्या देवकी नगर जंक्शनजवळ सुखलाल (नावात बदल) हे हिरे व्यापारी त्यांच्या होंडासिटी कारमधून सकाळी सव्वाआठच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी एका वॅगनआर कारने त्यांचा रस्ता अडविला. त्यातून खाली उतरलेले दोघे जण जबरदस्तीने सुखलाल यांच्या गाडीत शिरले आणि दहिसरच्या दिशेने गाडी पळविण्यास सुरुवात केली. त्यांनी सुखलाल यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईलदेखील हिसकावून घेतला. तर त्यांचे अन्य साथीदार वॅगनआर कारने सुखलाल बसलेल्या कारचा पाठलाग करू लागले. मात्र सुखलाल यांनी कसाबसा कारचा दरवाजा उघडून आरडाओरड केली आणि सर्व शक्तीनिशी चालत्या गाडीतून उडी मारली. त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष ११ व १२ कडून संमातर तपास सुरू होता. याबाबत कक्ष -११ चे प्रभारी निरीक्षक चिमाजी आढाव यांना या प्रकरणातील दोन जण सोमवारी कुलूपवाडी परिसरात येणार असल्याची टीप मिळाली आणि त्यांनी या ठिकाणी सापळा रचून त्या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत मालाड व मशीद बंदर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. इतर दोघे फरार आहेत. (प्रतिनिधी)