मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक, कमिशनवर दुसऱ्यांच्या खात्यांतून रक्कम वटवून घेणे अशी धडपड अनेकांनी सुरू केली आहे. यावर मुंबई पोलिसांसह आयकर विभागानेही करडी नजर ठेवली असून अशा प्रकारेच नागरिकांची आधारकार्ड घेऊन बँकेत आलेल्या जयेश शांतीलाल जैन (३४) या व्यापाऱ्याच्या भांडुप पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या. भांडुप पश्चिमेकडील एनकेजीएसबी बँकेमध्ये नोटा बदलून घेणे, तसेच जुन्या नोटा खात्यात जमा करण्यासाठी नागरिकांनी गुरुवारी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. याचाच फायदा उठवत स्वत: जवळील नोटांचे बंडल घेऊन जैन या ठिकाणी पोहोचला. नोटा बदलण्यासाठी असलेले फॉर्म बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून घेऊन सोबत नेलेल्या आधारकार्डच्या झेरॉक्सच्या आधारे तो नोटा बदलून घेऊ लागला. दुपारी चारच्या सुमारास त्याने अनिरुद्ध तिवारी याच्या आधारकार्डची झेरॉक्स त्याने पैसे बदलण्यासाठी बँकेत दिली. तिवारी हा बँकेचा नियमित ग्राहक असल्याने बॅक कमर्चाऱ्याने जैन हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आल्याचे ओळखले. त्यांनी तत्काळ याची माहिती भांडुप पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय कावळे यांनी जैनकडून आधारकार्डचा एक गठ्ठा आणि रबरी शिक्के जप्त केले आहेत. जैन याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
आधार कार्डद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न
By admin | Published: November 12, 2016 6:02 AM