Join us

गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने डॉक्टरांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:05 AM

महिला जखमी; शेजाऱ्यामुळे वाचले प्राण, जोगेश्वरी पोलिसांकडून तिघांना अटकफोटो ओळ: पहिला फाेटाे - चोरांचा पाठलाग करणारे नागेश ...

महिला जखमी; शेजाऱ्यामुळे वाचले प्राण, जोगेश्वरी पोलिसांकडून तिघांना अटक

फोटो ओळ: पहिला फाेटाे - चोरांचा पाठलाग करणारे नागेश बुरला.

दुसरा फाेटाे - सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चाेरटे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कडक निर्बंध असल्याने काेराेनाच्या ‘ब्रेक दि चेन’ला सहकार्य करुन नागरिक जीवनावश्यक वस्तू पार्सल मागवत आहेत. याचाच फायदा घेऊन चाेर डिलिव्हरी बॉयच्या वेशात इमारतीत प्रवेश करून लुबाडणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक फिल्मी थरार गुरुवारी जोगेश्वरीत घडला. चोरांनी गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या पत्नीला जखमी केले. मात्र शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला व आरोपीही गजाआड झाले.

जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले. नेमके त्याचवेळी इमारतीचा सुरक्षारक्षक तिथे नसल्याने रजिस्टरमध्ये नोंद न करता ते थेट सी विंगमधील सहाव्या मजल्यावरील डॉक्टर राजेशकुमार यादव यांच्या फ्लॅटसमोर उभे राहिले. त्यावेळी घरात फक्त डॉक्टरांची पत्नी सुशीला (४१) होत्या. पार्सल दिल्यावर पावतीवर सही करायला सांगत अचानक या चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. वार चुकवण्यासाठी त्या जमिनीवर बसल्या आणि जोरजोरात ओरडू लागल्या. या प्रयत्नात त्यांच्या हाताला चाकू लागला व त्या जखमी झाल्या. मात्र त्याचवेळी शेजारी नागेश बुर्ला बाहेर आले. प्रसंगावधान राखत त्यांनी चाेरट्यांच्या हातातला चाकू हिसकावला आणि आरडाओरडा करून सुरक्षारक्षक तसेच इतर रहिवाशांना गाेळा करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान दोन चोर घाबरून पार्किंगमधील छोट्या भिंतीवरून उड्या टाकून फाटकाबाहेर पळाले. त्यामागाेमाग तिसराही पळाला. बुरला यांच्यासह अन्य काही जणांनीही चाेरांचा पाठलाग केला. सुरक्षारक्षकाने सुमारे २०० मीटरपर्यंत पाठलाग करून एकाला पकडले. विक्रम यादव (३३) असे पकडण्यात आलेल्या चाेराचे नाव आहे.

बुर्ला यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुशीला यांचे प्राण वाचवले. त्यामुळे सोसायटीतील सदस्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. यादवला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपासाअंति त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. ज्यात एक जण डॉक्टर यादव यांच्या दवाखान्याजवळील मेडिकल स्टोअरमध्ये काम करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजय राजेंद्र यादव व राजेश गुज्जू यादव वय (१८) अशी अन्य दाेन चाेरट्यांची नावे आहेत.

* चोराच्या हातातला चाकू हिसकवला

मी चोरांच्या अंगावर धावत गेलो. त्यांच्या हातातील चाकू हिसकावला. त्यातील एकाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्यावर नियंत्रण मिळवता येणार नाही हे समजल्यावर तो पळाला. अखेर पाठलाग करून एकाला पकडण्यात आले. अन्य दाेघांनाही जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली.

- नागेश बुरला, यादव यांचे शेजारी

डिलिव्हरी बॉयच्या वेशात येणाऱ्यांचा सुरक्षारक्षकांना संशय येत नाही. याचाच फायदा घेऊन चाेरट्यांनी ही योजना आखली असावी.

त्यामुळे कडक निर्बंधांच्या काळात सर्वच नागरिकांनी सावध रहावे.

- मेघना सामंत, यादव यांचे शेजारी

-------------------------