- मनोहर कुंभेजकर, मुंबईगोरेगाव विधानसभेत विद्या ठाकूर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. राज्यात भाजपाच्या ज्या आठ मंत्र्यांनी प्रथम शपथ घेतली, त्यात महिला व बालकल्याण राज्यमंत्री म्हणून विद्या ठाकूर यांचा समावेश होता. सध्या महिला व बालविकाससह अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन अशा विविध खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत आहेत. या विविध खात्यांच्या कामकाजासह गोरेगावातील विकासासाठी त्या प्रयत्नशील आहेत. गोरेगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुरांच्या बाजाराची दुग्ध खात्याची शासकीय जागा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पाठपुरावा करून बस स्थानकासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे येथे आता सुसज्ज बस स्थानक होणार आहे. गोरेगाव (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर होणारी वाहतूककोंडी भविष्यात सुटेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २८ आॅक्टोबर रोजी येथील गुरांच्या मार्केटचे प्रवेशद्वार त्यांनी वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी खुले केले. त्यामुळे वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे. गोरेगाव (प़) रेल्वे स्थानकानजीक असलेल्या टोपीवाला मार्केट येथील व्यापाऱ्यांचा स्थलांतरचा प्रश्न मार्गी लागून तेथेही सुसज्ज मार्केट आणि नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. एमटीएनएल जंक्शन ते इनॉर्बिट मॉल यांना जोडणाऱ्या सावरकर उड्डाणपुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर राममंदिर पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या वर्षात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार असल्याचा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. बांगूरनगर येथील सीआरझेडचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या त्या प्रयत्नशील आहेत. गोरेगाव (पूर्व) येथील महिला प्रसूतीगृहाचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य शासनातर्फे यापूर्वी असलेल्या सुकन्या योजनेचा विस्तार करून ‘माझी कन्या भाग्यश्री’ या नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील मुलीच्या जन्माच्या वेळी २५,००० रुपये अनुदान देऊन ही ठेव मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी १ लाख एवढी होईल. ही रक्कम मुलीला पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांच्या बळकटीकरणावर तसेच अंगणवाड्यांची स्वत:ची इमारत बांधण्यासाठी १३व्या वित्त आयोगात भरीव प्रमाणात अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. स्तनदा माता तसेच गरोदर महिलांसाठी व नवजात शिशूसाठी राजमाता जिजाऊ आरोग्य पोषण अभियानांतर्गत तसेच एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत आढावा घेऊन ही योजना परिणामकारक राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धार्थनगर येथील म्हाडा आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नामुळे दोन वर्षे सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचबरोबर वाहतूककोंडी, पाणीटंचाई, गोरेगांवपर्यंत हार्बर लोकल लवकर सुरू करणे, नवे ओशिवरा रेल्वे स्थानक लवकर सुरू करणे हे गोरेगावमधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. या मुद््दयांचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत गोरेगावकरांनी व्यक्त केले.
गोरेगावच्या विकासासाठी प्रयत्नशील
By admin | Published: November 05, 2015 1:58 AM