CoronaVirus News in Mumbai: इमारतीखालील मोकळ्या पटांगणातील जागेत दारू गाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 01:07 AM2020-05-01T01:07:32+5:302020-05-01T01:07:45+5:30
नितेश राठोड, योगेश राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी यूट्युबवर पाहून हा प्रताप केला होता.
मुंबई : लॉकडाउनच्या काळात विरंगुळा म्हणून दोन तरुणांनी इमारतीच्या संरक्षक भिंंतीलगतच्या मोकळ्या पटांगणात चक्क दारू गाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची वर्दी लागताच आझाद मैदान पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. नितेश राठोड, योगेश राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी यूट्युबवर पाहून हा प्रताप केला होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राठोड आणि राजपूत एका इमारतीच्या संरक्षक भिंंतीलगत गॅस स्टोव्ह, प्लास्टिकची नळी जोडलेल्या प्रेशर कुकरच्या मदतीने दारू गाळण्याचा प्रताप करत होते. त्याच दरम्यान एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळवताच आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना रंगेहाथ अटक करत त्यांचा प्रयोग उधळून लावला आहे.
दोघेही धोबीतलाव येथील रहिवासी आहेत. दोघांविरुद्ध अशा प्रकारे प्रयोग करणे गुन्हा असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ती भट्टी नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
घरात बनतेय वाइन, बीयर
एकीकडे घरोघरी पाककलेचे वेध लागले असताना, काही मंडळी मद्यविक्रीची दुकानेही लॉक असल्याने विरंगुळा म्हणून घरातच गावठी दारूसह वाइन, बीयर, व्हिस्की बनविण्याचे प्रयोग करत आहेत. यूट्युबवरून असे व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. तर काही ठिकाणी थेट दुकानाचे शटर तोडून दारूचोरीच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातही दारूची दुकाने फोडून मद्यचोरीच्या घटना घडल्या आहेत़ दुकानांमध्ये सीसीटीव्ही असल्याने हे प्रकार उघडकीस आले आहेत़ तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दारूची दुकाने सुरू करण्याची विनंती राज्य शासनाला केली होती़ याद्वारे शासनाला महसूल मिळेल, असा दावाही त्यांनी केला होता़
>सोशल मीडियावर मागणीचा वर्षाव
लॉकडाउन सुरू झाल्याने दारूची दुकानेही बंद आहेत़ यामुळे तळीरामांची गैरसोय झाली आहे़ गैरसोय दूर करण्यासाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत़