मुंबई : गुजरातला विवाहासाठी गेलेले मुंबईतील वऱ्हाड परतीच्या मार्गावर असतानाच, वाड्यानजीक लुटारूंकडून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बसचालकाने सतर्कता दाखवत, घटनास्थळाहून बस सुसाट पुढे पळविल्याने लुटारूंचा हा प्रयत्न फसला. ६ डिसेंबरच्या मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भिवंडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असली, तरी घटना घडतेवेळी वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांच्या १०० या हेल्पलाइन क्रमांकावर वांरवार संपर्क साधला. मात्र, तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत संबधितांनी व्यक्त केली आहे.पश्चिम उपनगरात राहणारे एका कुटुंबाचे सदस्य नातेवाईकाच्या विवाहासाठी गुजरातमधील नवसारी शहरात खासगी बसने गेले होते. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई सोडून गुजरातमध्ये दाखल झालेल्या वऱ्हाडाच्या बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. यामध्ये महिला, मुले आणि पुरुष मंडळीचा समावेश होता. नातेवाईकाचा विवाह आटोपून हे कुटुंबीय पुन्हा मुंबईकडे येण्यास निघाले. ६ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजता वऱ्हाडाने नवसारी सोडले. प्रवासादरम्यान, साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी काही काळ विश्रांतीसाठी हायवेलगतच्या चहाच्या टपरीवर बस थांबविली. त्याचवेळी येथे चार ते पाच मोटरसायकल स्वार दाखल झाले. ते आपणास ओव्हरटेक का केले? असा प्रश्न करत वऱ्हाडच्या बस चालकाला मारहाण करू लागले. बसचालकाला मारहाण करतेवेळी संबधित मोटार सायकलस्वारांमध्येच वाद निर्माण झाला. या वादातच त्यांनी चहाची टपरी सोडली. मात्र, त्याचवेळी भांबावलेल्या वऱ्हाडी मंडळींनी घाईघाईत बसमध्ये स्वार होत, बसचालकाला गाडी निमूटपणे पुढे नेण्यास सांगितले. चहाची टपरी सोडून बस काही अंतरावरील वाड्यानजीक जाते, तोच पुन्हा सव्वाच्या सुमारास तेच मोटार सायकलस्वार बसला आडवे आले. त्यांनी मोटारसायकल बससमोर उभ्या केल्या. चालकाला बसमधून उतरण्यास सांगितले. नेमका याचवेळी पाठीमागून एक ट्रक येत होता. संबधित ट्रकला रस्ता देण्यासाठी बस पुढे नेतो, असे सांगत बसचालकाने बस थोडी पुढे नेत, सुसाट भिवंडीच्या दिशेने भरधाव नेली आणि वऱ्हाडी मंडळीचा जीव वाचविला, शिवाय त्यांना लुटण्यापासून वाचविले.
लुटण्याचा प्रयत्न फसला
By admin | Published: December 09, 2015 1:18 AM