Join us  

सराफ दुकान लुटण्याचा १०वीच्या विद्यार्थ्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 7:30 AM

नकली पिस्तुलाचा धाक दाखविला

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : दहावीतील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी फिल्मी स्टाईलने नकली पिस्तुलाचा धाक दाखवून सराफ दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकान मालक व नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा भाईंदर (पूर्व) भागात राहणारा असून, त्याला भरपूर पैसे कमवून मोठे व्हायचे होते. त्याला शेअर बाजारात गुंतविण्यासाठी पैसे हवे होते म्हणून त्याने दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला. त्याचे वडील भाजी विक्रीची हातगाडी लावतात.

अशोक जितमलजी जैन (५५, रा. पंचरत्न कॉम्प्लेक्स, दीडशे फूट मार्ग, भाईंदर पश्चिम उड्डाणपुलाजवळ) यांचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर देवसृष्टी इमारतीत शक्ती ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. शनिवारी जैन हे नेहमीप्रमाणे दुकानात असताना सव्वाचारच्या सुमारास एक मुलगा हातात बॅग घेऊन दुकानात आला. त्याने त्याच्याकडील पिस्तूल काढून जैन यांच्या छातीवर टेकवत धमकावले. दुकानातील सोन्याचे दागिने लुटण्याच्या प्रयत्नात असताना जैन यांनी त्याला प्रतिकार करण्यास सुरुवात करताच तो बाहेर पळाला. त्याच्यापाठोपाठ जैनसुद्धा बाहेर धावत गेले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमले आणि त्यांनी पळणाऱ्या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पिस्तूल नव्हे लायटर

त्याच्याकडील पिस्तूल हे नकली असून, ते एक लायटर असल्याचे आढळले. पेपर कापण्याचे कटर त्याच्याकडे होते. पोलिसांनी ते सर्व जप्त केले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातसुद्धा जबरी लूट करण्याचा प्रयत्न रेकॉर्ड झाला आहे. शनिवारी रात्री भाईंदर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

टॅग्स :मुंबईसोनंपोलिस