मुंबई - कालपासून सुरू झालेले महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन वादळी ठरत आहे. विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी उडत आहे. तर सभागृहाबाहेरही अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आज विधानभवनामध्ये अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच विधानभवनाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास विधान भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना प्रसंगावधान राखत या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र ही व्यक्ती कोण होती, कुठली होती आणि त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न का केला हे, अद्याप समोर आलेले नाही.
सध्या ही व्यक्ती मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याची चौकशी केली जात आहे. मात्र अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.