सहा दिवसांच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:55 AM2018-12-09T04:55:20+5:302018-12-09T04:56:40+5:30
कस्तुरबामध्ये आईसह चौघे ताब्यात; खोट्या आरोपात अडकविल्याचा महिलेचा दावा
मुंबई : सहा दिवसांच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आईवर करण्यात आला असून, या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी तिच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पैशांसाठी एका महिलेने खोट्या आरोपात अडकविल्याचे या चौघांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कस्तुरबा पोलिसांनी बोरीवली परिसरातून बाळाच्या आईसह चौघांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली परिसरात सुषमा (नावात बदल) ही महिला तीन मुले आणि पतीसोबत राहाते. आठवड्याभरापूर्वी तिने चौथ्या बाळाला जन्म दिला. तिच्या रिक्षाचालक पतीला दारूचे व्यसन असल्याने, नवजात बालकाचे पालनपोषण करण्यास ती असमर्थ होती. परिणामी, या बाळाची जबाबदारी मूलबाळ नसलेल्या जवळच्या एका नातेवाइकाकडे सोपविण्याचे तिने ठरविले. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंतीही तिने त्या नातेवाइकाला केली. त्याच दरम्यान तिची ओळख विजया (नावात बदल) या महिलेशी झाली. बाळाला विकून पैसे मिळतील, असे विजयाने तिला सांगितले. तेव्हा सुषमाने तिच्या शेजारच्यांकडे याबाबत सल्ला मागितला. शेजाऱ्यांनी सुषमाला विजयाच्या नादी न लागता, कायदेशीररीत्या बाळाला नातेवाइकांकडे सोपविण्याचे सुचविले. तिने त्यांचा सल्ला मान्य केला. ही बाब विजयाला समजली, तेव्हा तिने याची माहिती पोलिसांना देत, बाळाची विक्री करत असल्याचा आरोप केल्याचे सुषमाचे म्हणणे आहे.
कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी सुषमासह चौघांना ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
नातेवाईकांकडे देण्याचा शेजाऱ्यांचा सल्ला
बाळाला विकून पैसे मिळतील, असे एकीने सुषमाला सांगितले. सुषमाने शेजाºयांकडे सल्ला मागितला. शेजाºयांनी तिच्या नादी न लागता, बाळाला नातेवाइकांकडे सोपविण्याचे सुचविले.