आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: October 13, 2016 03:55 AM2016-10-13T03:55:13+5:302016-10-13T03:55:13+5:30
आश्रमशाळेत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचे प्राण लोकलमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे
अंबरनाथ : आश्रमशाळेत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचे प्राण लोकलमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले. बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत लोकलमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. सोमनाथ वाघमारे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्जत-खालापूर येथील डोलवली-माणकोली आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे.
सकाळी १० च्या सुमारास सोमनाथ हा कर्जत लोकलच्या दरवाजात येऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. वांगणी स्थानकावरून चढलेल्या दोन प्रवाशांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी सोमनाथला पकडून त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला अंबरनाथ स्थानकावर उतरून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सोमनाथला विचारले असता आपण शाळेतील मारहाणीला कंटाळून आत्महत्या करणार होतो, अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी आश्रमशाळेचे अधीक्षक सचिन पाटील यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी केली. सोमनाथला आश्रमशाळेतील काही विद्यार्थी मारहाण करत होते. तसेच त्यांच्यात भांडण झाले, तर शिक्षकही त्यालाच मारहाण करत होते. त्यामुळे तो आश्रमशाळेला कंटाळलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)