मुंबई - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत असताना मुंबईत मात्र शौचालय पाडण्यात येत आहे. घाटकोपर पश्चिम येथील भटवाडीमध्ये सार्वजनिक शौचालय विकासकाच्या फायद्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (घाटकोपर तालुका अध्यक्ष) सुदाम शिंदे यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न सोमवारी केला. मात्र पालिका सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवित त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
भटवाडी येथील राम जोशी मार्गावरील माता महाकाली सेवा मंडळ येथे शासकीय जमिनीवर ३८ आसनी शौचालय आहे. हे शौचालय धोकादायक ठरवून पाडण्याची कारवाई महापालिका करीत आहे. मात्र या परिसरात दुसरे शौचालय नसल्याने येथील दीड हजार रहिवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. या शौचालयाची जागा वाढविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र उपोषण, मोर्चे, आंदोलनंतरही महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. हे शौचालय चांगल्या दर्जाचा असल्याचा अहवाल यापूर्वी देण्यात आला असताना आता धोकादायक कसे ठरविण्यात येते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका छोट्या बाटलीतून त्यांनी रॉकेल आणले होते. मात्र तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांचा इरादा ओळखून त्यांच्या हातातील बाटली खेचून घेतल्याने अनर्थ टळला. त्यानंतर शिंदे यांना आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.