मनीषा म्हात्रे -
मुंबई : घाई गडबडीत इमारतीमधून बाहेर पडलेल्या महिलेला छेडल्यानंतर एका माथेफिरू दुचाकीस्वाराने बुटाची लेस बांधत थांबलेल्या तिच्या शाळकरी मुलीलाच गाडीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत घडली. आईसमोरच हा दुचाकीस्वार मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र आईने प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्यामुळे दुचाकीस्वाराने मुलीला तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी बोरिवली पोलीस अनोळखी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास करत आहे. गोराई परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय तक्रारदारांची दहा वर्षांची मुलगी नेहा (नावात बदल) येथील एका शाळेत चौथीत शिक्षण घेत आहे. त्या नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ८च्या सुमारास नेहाला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. गोराई येथील प्लॉट क्रमांक ७ येथे पोहोचताच, नेहाची बुटांची लेस सुटली. तिने आईला पुढे जाऊन शाळेची बस थांबविण्यास सांगितले. बसथांब्याच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तरुणाने त्यांना ड्रॉप करू का?, अशी विचारणा करत छेडले. नाही म्हणून उत्तर देत त्या बसथांब्यावर जाऊन थांबल्या आणि मागे वळून बघतात तोच मुलीचा ‘मुझे छोडदो छोडदो’ असा आवाज कानावर पडला. त्यांनी मुलीकडे धाव घेतली. दुचाकीस्वार मुलीला जबरदस्तीने घेऊन निघाला होता.
दुचाकीस्वार जवळ आला आणि बेटा मैं आपको आगे छोडू क्या, असे तो म्हणाला. त्याला नाही म्हणताच जबरदस्तीने तो मुलीला दुचाकीवर बसवून नेत होता, असे बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.