तपास अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न, पीएफ अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:15 AM2024-06-04T08:15:52+5:302024-06-04T08:15:58+5:30
अमरेश कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या पुणे येथील कार्यालयात कार्यरत होता.
मुंबई : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात केंद्रीय भविष्य निधी विभागाच्या (प्रॉव्हिडंट फंड) कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असताना चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. अमरेश कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या पुणे येथील कार्यालयात कार्यरत होता.
अमरेश कुमार हा आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत भ्रष्टाचार करीत असल्याची माहिती या विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात मुंबईत सीबीआयकडे लेखी तक्रार केली होती. प्रक्रियेनुसार सीबीआयने ही तक्रार प्राथमिक चौकशीसाठी प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या दक्षता विभागाला पाठविली. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी विभागाने दोन सदस्यांची नेमणूक करीत त्याची चौकशी सुरू केली होती. या चौकशीदरम्यान एके दिवशी अमरेश कुमार याने त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना मिठाईच्या बॉक्सचे वाटप केले.
चौकशी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येदेखील त्याने हे दोन बॉक्स नेऊन ठेवले. त्यावेळी हे अधिकारी केबिनमध्ये नव्हते. मात्र, त्यांनी जेव्हा हा बॉक्स उघडला त्यावेळी त्यात पैसे असल्याचे आढळले. हे पैसे त्यांनी अमरेश कुमार याला परत नेण्यास सांगितले. परंतु, त्याने ते परत घेतले नाहीत. त्यानंतर संबंधित चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली व या तक्रारीच्या आधारे अमरेश कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे.