Join us

बोरिवलीमध्ये दहा श्वानांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 9:39 AM

सोसायटी पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार सोमवारी बोरिवलीमध्ये उघडकीस आला. या दोन पिल्लांसह १० श्वानांना भिंत रचून त्यामागे जिवंत गाडण्यात आले होते. याप्रकरणी प्राणीप्रेमीच्या तक्रारीनंतर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात ॲक्विरीया ग्रँड या इमारतीच्या सोसायटीचा चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवलीच्या विंसी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पूर्णिमा शेट्टी या जवळपास ३०० भटके श्वान आणि मांजरीना जेवण देतात. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास त्या नेहमी प्रमाणे बोरिवली पश्चिमेच्या देविदास लेन येथे त्यांची वाट पाहणाऱ्या २० ते २२ श्वानांना जेवण देण्यासाठी आल्या. मात्र त्यांना बरेच श्वान गायब असल्याचे दिसले. ते कुठेच न सापडल्याने अखेर त्या ॲक्विरीया ग्रँड इमारतीच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत गेल्या. तेथे त्यांना एका दिवसातच उभी केलेली भिंत दिसली. तेव्हा त्यांनी भिंतीत वाकून पाहिले, तेव्हा त्यांना दहा श्वान आतमध्ये असलेल्या विजेच्या वायरवर दबकून बसलेले दिसले. तत्काळ त्यांनी दोन विटा काढत त्या श्वानांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भिंतीच्या उंचीमुळे ते बाहेर येऊ शकत नव्हते. तेव्हा शेट्टी यांनी त्यांच्या दोन मैत्रिणी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे तसेच ब्रेथ फाउंडेशन संस्थेच्या लता कुलकर्णी यांना बोलावून घेतले. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि एमएचबी कॉलनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने भिंत तोडून त्या श्वानांना बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी शेट्टी यांच्या तक्रारीनंतर इमारतीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सेक्रेटरी राजेश गांधी आणि खजिनदार सोनल शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :बोरिवलीकुत्रा