मुंबई : संपत्ती प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ५५ वर्षीय व्यक्तीने भर कोर्ट रूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या बाजूलाच उभ्या असलेल्या वकिलांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला अडवले.
दुपारी एक वाजेच्या सुमारास न्या. पी. डी. नाईक यांच्या कोर्टात हा प्रसंग घडला. आई व मुलामध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. न्यायालयाने सिनिअर सिटिझन कायद्यांतर्गत मुलाला म्हणजेच ५५ वर्षीय व्यक्तीला आईचे घर खाली करण्यास सांगितले. न्या. नाईक यांनी निर्णय सुनावल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याच्या पँटच्या खिशातील पेपर कटर काढले आणि त्याने हाताच्या मनगटावर फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या वकिलांनी प्रसंगावधान राखत त्याला मनगटावर चाकू फिरवण्यापासून अडवले.
न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. तसेच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना फोन करून त्याला घरी नेण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर प्रथमोपचार करण्यात आले. त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले.
न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर संबंधित व्यक्तीने चाकू न्यायालयात आणलाच कसा? अशी चर्चा न्यायालयात सुरू झाली. वकिलांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या दोन प्रवेशद्वारांजवळ असलेले मेटल डिटेक्टरर्स काही आठवड्यांपासून बंद आहे. ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळेच कदाचित या व्यक्तीच्या खिशात चाकू असल्याचे पोलिसांना समजले नसेल. कधी कधी काही प्रवेशद्वारांजवळील स्कॅनरही बंद पडते. त्यालाही दुरुस्त करण्यासाठी काही आठवडे तर कधी कधी काही महिने लागत असल्याचे वकिलांनी सांगितले. या घटनेने उच्च न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.