मुंबई - राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच, माजी खासदार संभाजीराजे यांनी 6 व्या जागेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, या निवडणुकीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या चर्चांमध्ये, वृत्तांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी देऊन जवळीक साधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची 15 दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर, राज्यसभेच्या जागेसंदर्भातील ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त स्पष्टपणे फेटाळले आहे.
''वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही,'' अशी माहिती वंचितचे प्रवक्ता आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही मोकळे यांनी म्हटले आहे. मोकळे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.