मुंबई - सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला होता. खार पोलीस ठाण्यात आलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले होते. तसेच चप्पल आणि बाटल्याही भिरकावल्या होत्या. दरम्यान, यावेळी सोमय्यांच्या ड्रायव्हरने घाईगडबडीत तिथून गाडी काढली होती. मात्र आता सोमय्यांच्या ड्रायव्हरवर शिवसैनिकांवर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
खार पोलीस ठाण्यात रवी राणा आणि नवनीत राणा यांना भेटण्यासाठी आलेले माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर काल रात्री हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली. या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.
त्यानंतर शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे. तर शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला नाही असं ते म्हणाले. सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पोलीस उद्धव ठाकरेंच्या घरचे नोकर आहेत का? जोपर्यंत खार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर घटनास्थळावरून हलणार नाही. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे घटनास्थळी पोहचत नाहीत तोवर जागा सोडणार नाही. माझी हत्या करण्यासाठी हल्ला करण्यात आला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.