पोलिसांना खाडीत बुडवण्याचा प्रयत्न, सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:15 AM2022-05-24T11:15:39+5:302022-05-24T11:15:48+5:30
वाळूमाफियांचे कृत्य, सहा जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाईंदर खाडीत बेकायदा वाळू उपसा करून ती वाहून नेणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या बोटीला धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केला. सहा वाळूमाफियांना पोलिसांनी पकडले.
भारतीय तटरक्षक दलाने १९ मे रोजी सागरी अभियान आयोजित केले असल्याने भाईंदर पोलीस ठाण्यातील अंमलदार संजय चव्हाण व हवालदार संजय महाले यांना भाईंदर पश्चिम खाडी किनाऱ्यावर बंदोबस्तासाठी तैनात केले होते. त्यावेळी खाडीमध्ये रेल्वे पुलाच्या बाजूला वाळूने भरलेली मोठी बोट व त्यावर सहा जण जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना किनाऱ्यावर येण्यास सांगूनदेखील ते न थांबता उलट बोटीचा वेग वाढवत भाईंदर पूर्व दिशेला पळू लागले. त्यामुळे पोलिसांनी धक्क्याजवळ असलेल्या रजनीकांत माछी या मच्छीमार बोट चालकाच्या बोटीतून वाळू तस्करी करणाऱ्या बोटीचा पाठलाग सुरू केला. खाडीमध्ये वाळूमाफियांच्या बोटीला गाठण्यासाठी मागून पोलीस बोटीने जात होते. पोलिसांनी वाळूमाफियांना बोट थांबवण्यास सांगितले. पोलिसांची बोट त्या वाळूच्या बोटीजवळ गेली असता त्यावरील वाळूमाफियांनी पोलिसांना खाडीत बुडवण्याच्या इराद्याने पोलिसांच्या बोटीला जोराची धडक दिली.
२५ हजार किमतीची वाळू केली जप्त
बोटीचा चालक सत्तर लखुद्दीन शेख (४५), जबुल अल्लाउद्दीन मंडल (३१), इंदादेन समत मंडल (५०), शहाबुद्दीन राहीन शेख (२७), सर्व रा. आरएनपी पार्क कोळीवाडा, भाईंदर पूर्व यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. बोट मालक रोमिओ डेनिस माल्या याची दोन लाख रुपये किमतीची शांतीसदन बोट व बोटीमधील २५ हजार किमतीची पाच ब्रास वाळू जप्त केली. पळून गेलेल्या नझर मुल्ला (२५) व हापीजुल (२८) या दोघांनासुद्धा पोलिसांनी अटक केली. आरोपींना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.