नालेसफाईचे कंत्राट चढ्या दराने घेण्याचा प्रयत्न फसला; मुंबई महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:25 IST2025-03-09T07:24:27+5:302025-03-09T07:25:09+5:30
२०२४ सालच्या दरानेच काम करण्यास भाग पाडले

नालेसफाईचे कंत्राट चढ्या दराने घेण्याचा प्रयत्न फसला; मुंबई महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले
मुंबई : पावसाळ्यापूर्व नालेसफाईचे कंत्राट जास्त दराने मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी परस्परांशी संगनमत केल्याची कुणकुण लागल्याने महापालिका प्रशासनाने त्यांना २०२४ सालच्या दरानेच काम करण्यास भाग पाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आहे.
पालिकेने शहर विभाग, पूर्व व पश्चिम उपनगरातील लहान मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढणे, तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कल्वर्टमधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेमध्ये पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन, चार आणि सातमधील मोठ्या नाल्यांच्या कंत्राट कामामध्ये कंत्राटदारांनी पालिकेच्या दरापेक्षा जास्त दराने काम मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ३ ते ९ टक्के जादा दराने काम पदरात पडून घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यासाठी त्यांनी परस्पर संगनमत केले होते. दर कमी करण्यासाठी या कंत्राटदारांसोबत दोनच दिवसांपूर्वी पालिकेत बैठक झाली होती.
यावेळी मात्र त्यांची डाळ शिजली नाही
काही कंत्राटदार काही प्रमाणात दर कमी करण्यास तयार झाले. मात्र, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कठोर भूमिका घेतली.
मागील वर्षीच्या दरानुसार काम करायचे असेल तर करा, अन्यथा नव्याने निविदा मागवू, असा इशारा त्यांनी दिल्याने कंत्राटदार नरमले. त्यानंतर पुन्हा वाटाघाटी झाल्या आणि दर कमी करण्यात आले.
कंत्राट पदरात पडून घेण्यासाठी काही कंत्राटदार नेहमीच परस्परांशी संगनमत करत असतात. एकत्र येऊन दराबाबत नमते न घेता पालिकेवरच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि कंत्राट पदरात पडून घेतात. मात्र, त्यांची डाळ शिजली नाही.