Join us

वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 8:24 AM

टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली होती. सहा वाहने एकमेकांवर आदळली.

बांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने  धडक दिली होती. 

ही धडक एवढी भयानक होती की, पुढे उभ्या असलेल्या एका मागोमाग एक अशा सहा कार अपघातग्रस्त झाल्या. काही गाड्यांचा चकनाचूर झाला होता. यामध्ये जागेवरच तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे झोन ९ चे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. 

हा अपघात पाहताच टोलनाक्यावरील कर्मचारी देखील जीव मुठीत घेऊन तिथून पळाले होते. अपघात घडविणारी कार आदळून तिथेच थांबली. या कारचा चालक जखमी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या चालकाची चौकशी सुरु आहे. जखमींपैकी एका व्यक्तीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पाच जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इनोव्हा कारमध्ये चालकासह एकूण सात प्रवासी होते. चालकावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मला मारण्याचा प्रयत्न - भाजप नेतावरळी सी लिंकवरील अपघातावेळी घटनास्थळी भाजपा नेता जितेंद्र चौधरी होते. त्यांनी या कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा केला आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजुला बसलेलो त्याच बाजुला कारने टक्कर मारली. परंतू, आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला आहे. एनबीटीने या दाव्याचे वृत्त दिले आहे. 

यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील असा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना टक्कर मारली. तो ड्रायव्हर पाकिस्तानी भाषेत बोलत होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे. 

टॅग्स :वांद्रे-वरळी सी लिंकअपघातभाजपा