गोरेगावात मॅनहोल कव्हर चोरीचा प्रयत्न फसला ! ओझोन जलतरण तलावाजवळील प्रकार
By गौरी टेंबकर | Published: October 13, 2023 03:25 PM2023-10-13T15:25:23+5:302023-10-13T15:25:45+5:30
Mumbai Crime News: गोरेगाव पश्चिमच्या ओझोन जलतरण तलाव परिसरात मॅनहोल कव्हर चोरी करण्याचा प्रयत्न फसला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने उघडकीस आला.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - गोरेगाव पश्चिमच्या ओझोन जलतरण तलाव परिसरात मॅनहोल कव्हर चोरी करण्याचा प्रयत्न फसला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने उघडकीस आला. त्यानुसार या विरोधात पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने गोरेगाव पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार योगेश राजपूत (३४) हे गोरेगाव पश्चिममध्ये मुख्य मलवाहिनी विभाग क्रमांक ३ या ठिकाणी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे कार्यालय ओझोन जलतरण तलाव परिसरात असून तिथे मुख्यमलवाहिनी परीक्षण संबंधित मॅनहोल कव्हर , कॉम्प्रेसर, चोक मशीन आणि लोखंडी पाईप अशी साधन सामग्री ठेवली आहे. त्याच्या संरक्षणासाठी पालिकेने या कार्यालयाला कंपाऊंड घालत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. राजपूत यांच्या तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी सदर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.
त्यावेळी एक विशितला तरुण लोखंडी गेटवरून सदर कार्यालयातच्या आत शिरताना आणि साधनसामग्री तपासताना त्यांना दिसला. तसेच त्यानंतर त्याने सामानात असलेले एक मॅनहोल कव्हर ओढत कार्यालयाच्या लोखंडी गेट जवळ आणले. मात्र ते वजनदार असल्याने त्याला ते गेटच्या बाहेर आणणे शक्य झाले नाही. अखेर त्याने ते तिथेच सोडून पुन्हा कार्यालयाच्या लोखंडी गेटवरून उडी मारून पळ काढला. याची माहिती राजपूत यांनी त्यांचे वरिष्ठ सहायक अभियंता मंदार माइंगडे यांना फोनवर दिली. माइंगडेच्या आदेशावरून गोरेगाव पोलिसात या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.