Join us

रात्रीच्या अंधारात कॉलेज तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; भावाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:52 AM

माहिममधील घटना : विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक

मुंबई : रात्रीचे जेवण उरकून २३ वर्षीय तरुणी आईसोबत कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली. आईला इमारतीखालीच थांबवून ती रस्ता ओलांडून कचरा टाकण्यासाठी पुढे आली, तेव्हा दारूच्या नशेत कारमध्ये बसलेल्या तरुणाने तिला आवाज देत जवळ बोलावले. तरुणीने भीतीने चालण्याचा वेग वाढविला. तोच तरुणाने पाठीमागून येत तिची ओढणी ओढत कपडे काढण्याचा प्रयत्न केला. नंतर केस धरून गाडीच्या दिशेने नेत असतानाच, तिच्या ओरडण्याचा आवाज भावाच्या कानावर पडला आणि विकृत तरुणाच्या तावडीतून तरुणीची सुटका झाल्याची घटना माहिममध्ये रविवारी रात्री उशिराने घडली.

माहिम परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहत असून, बीएच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे, तर वडील वकील आहे. रविवारी रात्री जेवण उरकल्यानंतर साडेबाराच्या सुमारास ती आईसोबत कचरा टाकण्यासाठी बाहेर आली. इमारतीजवळ लहान भाऊ असल्याने तरुणीने आईला इमारतीखालीच थांबवून रस्त्याच्या पलीकडे कचरा टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी कचराकुंडीजवळ फॉर्च्युनर कार उभी होती. त्याच दरम्यान आणखीन एक कार तेथे आली. त्या कारमधून एक तरुण बाहेर आला. तो ‘इधर आ जाओ’ म्हणत तिच्या पाठीमागे आला. हे पाहून तरुणी आणखीन घाबरली. त्यामुळे तिने चालण्याचा वेग वाढविताच तरुणाने पळत येत तिची ओढणी ओढली, नंतर तिचे केस पकडून तिला गाडीच्या दिशेने नेऊ लागला. तिच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडताच, तिच्या भावाने त्याला पकडले, तेव्हा तरुणाने भावाला शिवीगाळ सुरू केली. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका होताच, आईला घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा त्यांना धक्का बसला.

ही बाब समजताच अन्य नातेवाइकांनी मुलांना पकडण्यासाठी धाव घेतली. घटनेची वर्दी मिळताच माहिम पोलीसही तेथे दाखल झाले. तरुणाला चोप देत पोलीस ठाण्यात आणले. त्यात तरुणाचे नाव अरबाज दिलदार नकवी (२१) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, नकवीच्या चौकशीतून नावेद नौशाद खानचे नाव समोर आले. त्यानुसार, माहिम पोलिसांनी तत्काळ दोघांनाही विनयभंगाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. दोघेही माहिमचे रहिवासी आहेत.आरोपी कॉलेज विद्यार्थीया प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही कॉलेजचे विद्यार्थी असून, तरुणीच्या ओळखीचे नाहीत. त्यापैकी एकाने दारूच्या नशेत हा प्रकार केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गाडनकुश यांनी दिली.

टॅग्स :पोलिसअपहरणमुंबई