- गौरी टेंबकर - कलगुटकर ।मुंबई : कॉलेजच्या रस्त्यावर दोन विद्यार्थिनींचा विनयभंग करून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यालाही मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार चार महिन्यांपूर्वी अंधेरी परिसरात घडला असून या प्रकरणी प्रशांत प्रकाश ऐतवडेकर (२९) या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या शनिवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० ने आवळल्या. या प्रकरणी अंधेरी पोलीस चौकशी करत असून त्याच्या साथीदाराचा प्रतीक याला यापूर्वीच अटक झाली आहे.अंधेरी पूर्वच्या विशाल हॉलजवळ असलेल्या आकाश ज्युनियर कॉलेजमध्ये दोन पीडिता टीना (नावात बदल) आणि मीना (नावात बदल) या विद्यार्थिनी इयत्ता बारावीच्या वर्गात वाणिज्य शाखेत शिकतात. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅगस्ट रोजी या दोघी कॉलेजला जाण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास बस थांब्यावर उभ्या होत्या. तेव्हा प्रशांत आणि प्रतीक नामक अनोळखी व्यक्ती तेथे आल्या आणि तेकॉलेजचे कमिटी सदस्य असल्याचे त्यांनी या दोघींना सांगितले. प्रतीक टीनासोबत गप्पा मारत तिचा पत्ता विचारू लागला. त्याचे वडील पोलीस खात्यात असल्याचेही त्याने टीनाला सांगितले. बोलता बोलता कॉलेजजवळच्या एका पडीक इमारतीकडे तो टीनाला घेऊन गेला आणि टेरेस दाखवतो असे सांगून त्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टीना त्याला धक्का देत कॉलेजच्या आवारात पळाली. तर दुसरीकडे कॉलेजमध्ये पोहोचल्यावर प्रशांत मीनासोबत उभा राहून मीना त्याची बायको आहे, असे अन्य विद्यार्थ्यांना सांगत होता. तेव्हा घाबरलेल्या टीनाने मीनाला सोबत घेतले आणि कॉलेजमध्ये शिरली. त्यानंतर घडलेला प्रकार त्यांचा मित्र समीर (नावात बदल) आणिअन्य वर्गमित्रांना सांगितला. त्यामुळे सर्व मित्र- मैत्रिणी वर्गात न जाता कॉलेजच्या आवारातच थांबले. काही वेळाने पुन्हा प्रशांत आणि प्रतीक एका कारमधून आले आणि मीनाला गाडीत बस नाहीतर हात धरून बसवू अशी धमकी देऊ लागले. मात्र तिने त्यांना नकार दिला. समीर तिला वाचविण्यासाठी पुढे आला म्हणून प्रतीकने त्यालाही मारहाण करत एका स्कूल व्हॅनमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते दोघे घटनास्थळाहून पसार झाले. या सगळा प्रकार विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कॉलेजच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेत अंधेरी पोलीस ठाणे गाठले आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० चे प्रमुख श्रीमंत शिंदे आणि त्यांचे पथक दोघांचा शोध घेत असताना त्यातील एक जण अंधेरीला येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून प्रशांतला अटक केली.